महेंद्रसिंग धोनी, अॅलिस्टर कूक, मायकल क्लार्क, ग्रॅमी स्मिथ, महेला जयवर्धने आणि रॉस टेलर यांच्यात काय साम्य आहे ? तर हे सर्व जण सध्या आंतरराष्ट्रीय टीमचे कॅप्टन आहेत. धोनी आणि अन्य कॅप्टनमधील फरक काय ? तर हे सर्व कॅप्टन्स सध्या सुरु असलेल्या टेस्ट मॅचमध्ये आपल्या टीमच्या वाटचालीत निर्णायक भूमिका ( कॅप्टन्स नॉक ) बजावत आहेत. ( यामधील महेला जयवर्धनेने हा ब्लॉग लिहत असताना कोलोंबो टेस्टमध्ये फलंदाजी केली नव्हती. मात्र यापूर्वी झालेल्या टी-20 विश्वचषकात श्रीलंकेच्या अंतिम फेरी पर्यंतच्या वाटचालीत त्याचा वाटा सिंहाचा होता. )
महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होऊन आता पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. दोन विश्वचषक जिंकले ही सर्वात जमेची बाजू. पण आज त्या विश्वचषक विजयाचा आढावा घेत असताना काय लक्षात येते ? 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या दरम्यान टी-20 हा प्रकार जागतिक क्रिकेटला नवा होता. टीम इंडियासह कोणत्याच संघाला याचा फारसा सराव नव्हता. युवराज सिंगचा जबरदस्त फॉर्म आणि त्याला अन्य युवा खेळाडूंनी दिलेली साथ ह्याच्या जोरावावर आपण तो विश्वचषक जिंकला. हां आता फायनलमध्ये धोनीचा जुगार फळला की मिसाबह-उल-हकचा उतावीळपणा पथ्यावर पडला ह्यावर वाद होऊ शकतो. ठीक आहे, आपण धोनीच्या कल्पकतेला संशयाचा फायदा देऊ. मग ही कल्पकता नंतरच्या तीन टी-20 विश्वचषकात कुठे लोप पावली ?
त्यानंतरचे दोन विश्वचषक धोनीने सर (!!!) रवींद्र जाडेजाच्या प्रेमापोटी ओवाळून टाकले.यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीरेंद्र सेहवागला बसवले. फॉर्म हाच निकष लावयचा असेल तर सेहवागच्या आगोदर रोहित शर्माचा नंबर होता. पण रोहित प्रत्येक मॅच खेळला. कांगारुंनी आपल्या फलंदाजाचे नेहमीचेचे कच्चे दुवे हेरुन नेहमीप्रमाणेच आखूड टप्याचे चेंडू टाकले. भारतीय बॅटिंग गडगडली.आणि धोनीसाहेबांनी वॉटसन आणि वॉर्नर या कसायांच्या जोडीसमोर हरभजन आणि चावला हे भंपक बॉलर्स उभे केले. नऊ विकेट्सने सपाटून पराभव झाला. रनरेटचे गणित बोंबलले, ते शेवटपर्यंत सुधारलेच नाही.
आता 2011 च्या विश्वचषकाचा मागोवा घेऊया.मला आपल्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचा कुठेही अपमान करावयाचा नाही किंवा संशयही घ्यायचा नाही. पण त्या विश्वचषकात अन्य देशांची स्थिती कशी होती ? ऑस्ट्रेलिय टीम 'अॅशेस'च्या राखेतून बाहेर पडली नव्हती. इंग्लंडला भारतीय उपखंडात कधीच फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिका चोकर्स म्हणूनच ओळखली जाते. वेस्ट इंडिजचा बो-या वाजलेला होता. न्यूझीलंडच्या यशाला नेहमीच मर्यादा असतात. पाकिस्तानचा कधीच भरवसा देता येत नाही. आता उरलेले दोन महत्वाचे संघ भारत व श्रीलंका फायनलमध्ये आले.
फायनलमध्ये सुरुवातीच्या यशाचा फायदा उचलण्यात भारतीय बॉलर्स अपयशी ठरले. ( हे आपले नेहमीचे दुखणे आहे, दोन-तीन विकेट्स झटपट मिळाल्या की आपली टीम गाफिल होते. नंतर मग एखादी जोडी अशी काही जमते की यापूर्वीच्या सर्व कामगिरीचा बट्याबोळ होतो) झहीरने शेवटच्या स्पेलमध्ये 2003 च्या फायनलची आठवण करुन दिली. जयवर्धनेने एक अविस्मरणीय शतक झळकावले. आपल्यासमोर आव्हानात्मक टार्गेट होते.
या टार्गेटचा पाठलाग करताना धोनीने स्वत:ला बढती दिली. त्याचा जुगार पुन्हा यशस्वी ठरला. पण फायनलमध्ये श्रीलंकाच्या ऐवजी ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका असते तर धोनी पाचव्या क्रमांकावर आला असता का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारुन पाहवा. मलिंगाचा पहिला स्पेल संपला होता. त्यामुळे त्याला शेवटासाठी राखून ठेवणे संगकाराला भाग होते. मुरलीधरन आणि निवृत्ती यामध्ये काही तासांचे अंतर उरले होते. मलिंगा आणि मुरलीशिवाय बाकी लंकेची बॉलिंग खेळणे धोनीला आरामात शक्य होते. ब्रेट ली, जॉन्सन. शॉन टेट किंवा मॉर्केल, स्टेन, कॅलीस ह्या मा-यासमोर धोनीने पाचव्या क्रमांकावर खेळण्याचे धाडस केले असते आणि तो त्यात यशस्वी ठरला असता हे त्याच्या आजवरच्या इतिहासाचा आणि फलंदाजीतील वकूबाचा अभ्यास करता अगदी अशक्य वाटते.
वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे कोच बदलले. धोनी-फ्लेचर जोडीने परदेशातील सलग आठ टेस्टमध्ये शरणागती पत्कारली. अगदी औषधालाही एखादी कसोटी वाचविता आली नाही. टीम इंडियाचे वस्त्रहरण
झाले.
आता सध्या सुरु असलेल्या भारत-इंग्लंड सीरिजला बदला सीरिज असे रुप आले आहे. अगदी बरोबर आहे. पण फॉर्मात नसलेल्या हरभजनला खेळवून बदला कसा पूर्ण होणार हा माझा प्रश्न आहे. सध्या सर्वच देश नव्या खेळाडूंना संधी देत आहेत. आपण मात्र तिसरा पर्याय म्हणून हरभजनची निवड करतो. वास्तविक इक्बाल अब्दुल्ला किंवा हरमीत सिंग हे युवा गोलंदाज आपल्याकडे आहेत. त्यांची शैलीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अगदीच अपरिचीत आहे.त्यांचा फायदा घेण्याची कल्पकता निवड समितीला दाखविता आली असती. धाडसी खेळ आणि डावपेचांसाठी प्रसिद्ध असलेल्या संदीप पाटील यांनी हरभजनला घेत टीमला बॅकफूटवर ढकलले.
आपल्या कॅप्टनची मागील काही कसोटीतील सरासरी ही अगदी अश्निनपेक्षाही कमी आहे. अहमदाबाद कसोटीत इंग्लंडच्या पडझडीतही कूकने लाजवाब संघर्ष केला. भारतीय खेळपट्यांचा धसका घेतलेल्या इंग्लिश संघला अहमदाबामध्ये 'कूकस्पर्श' मिळाला. कॅप्टन कूकने जागवलेल्या याच आत्मविश्वासाच्या जोरावर इंग्लिश संघाने साडेतीन दिवसांत टीम इंडियाची माती केली. दोन्ही डावात संघाची गरज पूर्ण करण्यात आपले 'कॅप्टन कूल' सपशेल अपयशी ठरले.
भारतीय टीमच्या या पराभवात धोनीच्या बरोबरीने टीमचे कोच डंकन फ्लेचरही गुन्हेगार आहेत. फ्लेचरच्या काळात धोनी-सेहवागमधील शीतयुद्ध पुन्हा सुरु झाले. लक्ष्मणच्या खराब फॉर्मवर त्यांना शेवटपर्यंत उत्तर सापडलेच नाही. गौतम गंभीरने शेवटचे कसोटी शतक कधी झळकावले आहे हे आता राम गोपाल वर्मांनी शेवटचा चांगला चित्रपट कधी केला हे आठवण्याइतके अवघड होऊन बसले आहे. हरभजनचा भंपकपणा कायम आहे. रैनाची टेस्टमधील दैना अजून संपलेली नाही. विराट कोहली तर मागील दोन टेस्टमध्ये बाद झाल्यानंतर पॅव्हीलियनमध्ये परतताना वेगवेगळ्या भावना कशा दाखवयाच्या याचा सराव करत आहे. मनोज तिवारीचा उमेदीचा कालखंड बारावा खेळाडू म्हणून वाया जातोय. 'फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट' असे क्रिकेटमध्ये नेहमी म्हंटले जाते. मात्र 'बॉलिंग इज टेम्पररी बॅटिंग इज परमनंट ' अशी अश्विनची अवस्था झाली आहे. थोडक्यात त्याचा इरफान पठाण होण्याची चिन्हे आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यासारख्या देशात नव्या गोलंदाजांची फौज तयार होत असताना अजूनही फ्लेचर साहेबांना झहीरचा वारसदार शोधता आला नाही. त्यातच सचिन आणि झहीर हे दोघे आता अस्ताला आलेत. त्यांच्यानंतर टीम इंडियाची टेस्ट मॅच पाहणे सोडून द्यावे असा माझा विचार आता प्रबळ होत चालला आहे.
पीटरसन-फ्लॉवरमधील संघर्ष सा-या जगाने नुकताच पाहिला. अहमदाबाद कसोटीत पीटरसन फ्लॉप झाल्यानंतर ह्याच फ्लॉवरने ग्रॅहम गूचच्या मदतीने पीटरसनच्या कच्या दूव्यावर मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीचे फळ इंग्लंडला मिळाले.ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सीरीजमधील पहिल्या टेस्टमध्ये टीम अडचणीत असताना क्लार्कने डबल सेंच्युरी झळकावली. अॅडलेडमध्ये कांगारुंच्या विशाल धावसंख्येला उत्तर देताना ग्रॅमी स्मिथमधला कॅप्टन जागा झाला. कस्टर्न आणि कंपनीने केलेल्या मार्गदर्शनामुळेच ड्यू प्लेसीला आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये तेही चौथ्या डावात शतक झळकवता आले. कॅप्टन आणि कोच प्रेरणादायी असले की टीमच्या कामगिरीत सकारात्मक बदल तात्काळ दिसून येतात. हेच बदल घडविण्यात धोनी आणि फ्लेचर अपयशी होत आहेत. त्यामुळेच धोनी व फ्लेचर यांची आम्हांला लाज वाटते !
टीप- महेंद्रसिंग धोनीवरील कब तक धोनी ? हा माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
9 comments:
तुमचे बरेच मुद्दे पटले, मात्र आपण सचिनवर काहीच नाही लिहले ? तो काय वेगळे दिवे लावतोय ? टीममधला सर्वात अनुभवी खेळाडूच फ्लॉप असेल तर बाकीच्यांना हूरुप कसा येणार ?
फ्लेचर? हा कोण?
राजकारणात जसे निवडणूक हरल्यावर पक्षाची चिंतन बैठक होते तशी जर धोनी ने एक बैठक घेतली तर त्यातून काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही. एकमेकाची उणी दुणी काढतील.
कसाब च्या बातमीने मिळालेला निर्भेळ आनंद ह्या क्रिकेटर लोकांनी एका क्षणात धुळीस मिळवला.
सध्याच्या संघातून वृद्धांना निवृत्त करा , तरुणांना फक्त आय पी एल खेळू द्या ,
व संघ हिताला प्राधान्य देणाऱ्या खेळाड रणजी व इतर स्पर्धेतून निवडून फक्त त्यांना राष्ट्रीय संघात प्रवेश द्यावा.
नेहमीप्रमाणे अप्रतिम!!! सूर्यास्त झाले आहेत.
fantastic...
fantastic..
Blog is good as usual...liked your analysis and the options you suggested.
However, I did not expect Onkar Danke's 26/11 blog on Cricket.. :(
nehamipramane chan aahe blog...rokh-tokh
Sehr richtig. Für mich, sehen das leben nach Sachin ist died Notwindigkeit.
Post a Comment